विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर – महाकाल प्रतिष्ठान आणि संभाजीनगर प्लॉगर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच जिल्हा परिषद मैदान येथे ‘मी साकारणार माझा बाप्पा’ इकोफ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या शिबिरात २०० पेक्षा अधिक सदस्यांनी सहभाग नोंदवत ३०० किलो लाल मातीपासुन गणपती बाप्पाच्या तब्बल १५० मूर्त्या तयार केल्या. लहान मुले व तरुणांनी बनवलेली मूर्ती ते आपल्या घरी स्थापना करणार आहेत.
गेल्या सहा वर्षांपासून महाकाल प्रतिष्ठान व संभाजीनगर प्लॉगर्सतर्फे इकोफ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती व्हावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. लाल माती, जुने वर्तमानपत्र, पाण्याची बाटली, कपडे, टूथपिक, मूर्ती ठेवण्यासाठी कार्डबोर्ड असे साहित्य देऊन मुलांकडून गणेश मूर्ती तयार करून घेण्यात आल्या.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजीनगर प्लॉगर्स आणि महाकाल प्रतिष्ठान मधील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

No Comment! Be the first one.