नवरात्रातील सातव्या माळीला आमदार विलास भुमरेंनी चौढाळा येथील रेणुकामातेच्या चरणी घातले साकडे; भाविकांसाठी मंदिर परिसराचा विकास करण्याचे आश्वासन
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे पैठण :
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी यावी आणि शेतकऱ्यांचे राज्य यावे, यासाठी पैठण तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांनी नवरात्रोत्सवातील सातव्या माळीचे औचित्य साधून हिवरा चौढाळा येथील रेणुकामातेच्या चरणी नतमस्तक होत साकडे घातले.
हिवरा चौढाळा येथील रेणुकामातेचे मंदिर भक्तांच्या नवसाला पावणारे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर माहूर गडावरील रेणुकामातेचे उपपीठ म्हणून ओळखले जाते. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या काळातील असल्याची श्रद्धा आहे. मंदिराला कळस नसून सुमारे वीस खांबांचा भव्य सभामंडप आहे.
रेणुकामाता कुमारीका असल्याच्या श्रद्धेमुळे चौढाळा गावात विवाहसोहळे आयोजित केले जात नाहीत. गावाबाहेर विवाहविधी पार पाडण्याची परंपरा आजही जपली जाते. तसेच गावाच्या पंचक्रोशीत दुमजली घरे बांधली जात नाहीत, अशीही स्थानिक श्रद्धा आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक रेणुकामातेच्या दर्शनासाठी चौढाळा येथे दाखल होतात. सातव्या माळीच्या दिवशी मंदिर परिसरात विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसराचा विकास करण्यात येईल, अशी माहिती आमदार भुमरे यांनी यावेळी दिली.
रेणुकामाता उत्सव नियोजन समितीचे संतोष काळे, नारायण गाभुड आणि आबासाहेब खेडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
याप्रसंगी आप्पासाहेब निर्मळ, विनोद बोंबले, रवींद्र काळे, भूषण कावसानकर, सरपंच गिरगे, जिल्हा परिषद सदस्य नितीन तांबे, पंचायत समिती सदस्य प्रमोद पन्हाळकर, प्रदीप नरके, सतीश काळे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No Comment! Be the first one.