सातव्या माळेला यात्रेचा मुख्य दिवस; साडेआठशे बालकांचे नवस पूर्ण, हजारो भाविकांनी घेतले दर्शन
लोकार्थ प्रतिनिधी पंकज पवार अंबड
अंबड येथील श्री मत्स्योदरी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील यात्रेचा मुख्य दिवस असलेली सातवी माळ शनिवारी (दि. १७) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. मंदिराच्या पायऱ्यांपासून दर्शनासाठी रांगा लागल्या असून, दिवसभर मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता.
सातव्या माळेनिमित्त माजी मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते श्री मत्स्योदरी देवीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी मनीषाताई टोपे तसेच समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन दिशाताई टोपे यांनीही देवीचे पूजन केले. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.
मत्स्योदरी देवीच्या मंदिरात नवस फेडण्याच्या विविध परंपरा आजही श्रद्धेने जपल्या जातात. सातव्या माळेनिमित्त लहान बालकांना उंचावरून झोळीत टाकून नवस फेडण्याच्या परंपरेत अनेक भाविक सहभागी झाले होते. दिवसभरात सुमारे साडेआठशे बालकांचे नवस फेडण्यात आले. तसेच जवळपास एक हजार भाविकांनी मंदिराच्या प्रत्येक पायरीवर नारळ फोडून देवीप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध वस्तूंची दुकाने, रहाटपाळणे आणि मनोरंजनाची साधने उभारण्यात आली होती. त्यामुळे परिसरात यात्रेची मोठी रेलचेल पाहायला मिळाली. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान संस्थानकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट तसेच स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यात्रेदरम्यान गर्दीचे नियोजन करण्यासाठी अंबड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ७० विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. दर्शन रांगा सुरळीत ठेवण्यासह भाविकांना मदत करण्याचे काम त्यांनी केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनानेही बंदोबस्त ठेवला होता.
सातव्या माळेनिमित्त झालेल्या भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे मत्स्योदरी देवीच्या यात्रेला भक्तिमय वातावरणात रंगत आली. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नवस फेडत आणि दर्शनाचा लाभ घेत यात्रेचा मुख्य दिवस उत्साहात साजरा केला.

No Comment! Be the first one.