लोकार्थ प्रतिनिधी माजलगाव
माजलगाव तालुक्यातील माजलगाव-तेलगाव रस्त्यावर उषा महादेव पेट्रोल पंप शिंदेवाडी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात रविवारी पाच जणांचा मृत्यू झााला होता. या प्रकरणी खामगाव ते पंढरपूर मार्गावर सिमेंट रस्त्याचं काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन (DBL) कंपनीसह संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ व १०६(१) अन्वये गुन्हा क्रमांक ४६७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलीस नोंदीनुसार, रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १०.५० वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली. या दुर्घटनेत ओंकार महादेव गिरी (वय २०), गजानन महादेव नामदास (वय ३५), समर्थ गजानन नामदास (वय १२), क्रतिक मोतीलाल बडे (वय १८) आणि अनिल सेन यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
मृतांपैकी काही जण माजलगाव शहरातील, तर एक जण गेवराई तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणी ज्ञानेश्वर महादेव गिरी (वय २६, रा. शिंपेटाकळी, ता. माजलगाव) यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, खामगाव ते पंढरपूर मार्गावरील सिमेंट रस्त्याच्या कामात संबंधित कंपनी, कंत्राटदार व अभियंत्यांकडून हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा झाल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला.
रस्त्याचे काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, कामाच्या ठिकाणी पुरेशी खबरदारी घेतली होती का आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने कोणती पावले उचलली होती, असे प्रश्न या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहेत.
मात्र, अपघाताचे नेमके कारण आणि संबंधितांची जबाबदारी तपासातून स्पष्ट होणार आहे. रस्ते बांधकामाचे काम सुरू असताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या कंपन्या, कंत्राटदार आणि अभियंत्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. अशा कामांमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याने गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. संबंधित कंपनी, कंत्राटदार किंवा अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तपासातील निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत.
राजस्थानातून माजलगाव येथे आचारी म्हणून व्यवसाय करणारा जबरा राम यांची परिस्थिती इतकी नाजूक आहे की, वडील वारले, मोठा भाऊ आजारी व आई वयोवृद्ध असल्याने त्यांचे कुणीच नातेवाईक इथपर्यंत येऊन शकत नाहीत. त्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला असून, तो स्वतः अविवाहित आहे. या बाबत माजलगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे.
क्रतिक मोतीलाल बडे होता कुटुंबाचा आधार
या अपघातात ठार झालेला क्रतिक मोतीलाल बडे याला वडील नसल्याने तो आपल्या आईजवळ माजलगाव शहरातील फुलेनगर भागात राहत होता. माजलगाव शहरातील बसस्थानक परिसरात भेळच्या गाड्यावर काम करून कुटुंबाचा आधार होता.
गजानन नामदास व समर्थ या बापलेकाचा झाला घात
माजलगाव शहरातील अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा गजानन हा संकुलचा चारचाकी रिक्षा चालवत होता. वडीलही हाच व्यवसाय करत होते. आई, पत्नी यांनी भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे कुटुंब होते. अत्यंत चांगल्या स्वभावाचा गजू म्हणून ओळख असलेल्या या अपघाताने माजलगाव येथे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ओम गिरी याचा भाजीपाला व्यवसाय
सर्वांशी परिचयाचा ओम गिरी भाजी-पाला व्यवसाय करत समाजकार्याशी जोडला गेला होता. शिंपेटाकळी येथील ओम गिरी हा उमदा तरुण माजलगाव शहरातील सर्वांच्या संपर्कातील होता. त्यांनी पवार हॉस्पिटलजवळ भाजीपाल्याचा स्टॉल टाकून चांगला व्यवसाय करत होता. याच्या या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
No Comment! Be the first one.