62 ग्रॅम वजनाच्या ब्राऊन शुगरसह 3.10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड – शहरातील श्रीनगर येथून ब्राऊन शुगर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ६२ ग्राम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले आहे. दरम्यान दोन जणांविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे व त्यांचे सहकारी भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, श्रीनगर, विवेकनगर येथील आशिष किराणा दुकानाजवळ सिमेंट रोडवर दोन इसम स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्याब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने येत असून त्यांच्या जवळ ब्राऊन शुगर हे अमंली पदार्थ आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे यांनी सदरील माहिती पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन यांना दिली. त्यांची रितसर परवानगी घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वात छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनाही या कारवाईबाबत अवगत करण्यात आले. त्यानंतर शासकीय पंच, वैधमापन शास्त्र विभागाचे राजपत्रित अधिकारी व पोलीस पथकासह दुपारच्या सुमारास श्रीनगर येथील विवेकनगर परिसरात आशिष किराणा दुकानाजवळ छापा टाकण्यात आला. यावेळी बातमीतील वर्णनाप्रमाणे दोन संशयित इसम आढळून आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी गुरबिरसिंग हरपालसिंग संधु श्रीनगर, नांदेड, जनार्दन गोविंदराव सोनटक्के रा. ब्राम्हणवाडा अशी सांगीतली.
पोलिसांनी राजपत्रित अधिकारी व शासकीय पंचांच्या समक्ष दोन्ही इसमांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या पॅन्टच्या खिशातून अंमली पदार्थ ‘ब्राऊन शुगर’ (चिटा) एकूण वजन 62 ग्रॅम मिळून आले. त्यांची अंदाजे 3 लाख 10 हजार रुपये आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्सचे सहाय्यक रासायनिक विश्लेषक यांच्याकडून सदर पदार्थ हा ‘ब्राऊन शुगर’ असल्याची खात्री करुन जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडे सदर अंमली पदार्थाबाबत विचारपूस केली असता, त्यांनी हा माल निक्का व बंटी (दोघे रा. राज्य पंजाब) यांच्याकडून विकत आणल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवि वाहुळे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन भाग्यनगर ठाण्यात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षकरवि वाहुळे, पोलिस उपनिरीक्षक बळीराम दासरे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, गुंडेराव करले, रितेश कुलथे, दिलीपकुमार चंचलवार, उमर शेख, सुनिल गटलेवार, मोतीराम पवार, सिध्दार्थ सोनसळे, नरेन्द्र राठोड (शासकीय फोटोग्राफर) तसेच ब्रम्हानंद सावते, निरीक्षक, वैधमापन शास्त्र विभाग (राजपत्रित अधिकारी) व राजेश पांचाळ, वेदांत नगनुरवार (फॉरेन्सिक विभाग) यांनी पार पाडली आहे.
No Comment! Be the first one.