पदवीधरांच्या रोजगारासाठी काय केले? बनवस्करांचा सवाल; शैक्षणिक संस्थांच्या विस्तारावरही आरोप
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
जालना- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले असल्याची टीका ॲड. रोहित बनवस्कर यांनी केली असून चव्हाण यांनी केवळ नातलगांच्या शैक्षणिक संस्था वाढीचे काम केले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना ॲड. बनवस्कर म्हणाले की, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे सतीश चव्हाण यांनी स्टील व सीड हब सारख्या जालना शहरातील पदवीधर तरूणांच्या रोजगारासाठी काही एक केले नाही, जर त्यांनी स्थानिक पदवीधरांना रोजगार उपलब्ध करून दिला असता तर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात परप्रांतीय कामगार दिसलेच नसते, आपल्या आमदारकीच्या काळात आपण किती पदवीधर तरूणांना रोजगार उपलब्ध करून दिला, हे सतीश चव्हाण यांनी जाहीर करावे, असे आव्हानही ॲड. बनवस्कर यांनी यावेळी दिले. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आली की सतीश चव्हाण यांचे पदवीधरांना दर्शन होते. त्यांच्याकडे पगारी कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांना सामान्य पदवीधरांसाविषयी काही घेणे- देणे नसल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याची केवळ घोषणाच झाली, त्याचे पुढे काय झाले, याचा खुलासा सतीश चव्हाण यांनी करावा, एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नसल्याची टीका ॲड. बनवस्कर यांनी यावेळी केली. एमपीएससीची तयारी करणाऱ्या पदवीधरासाठी चव्हाण यांनी एखादे ग्रंथालय उभारले का?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी ३० सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत असतांना २६ सप्टेंबरलाच ही नावनोंदणी बंद करण्यात आली, यामुळे अनेक विद्यार्थी मतदार नाव नोंदणीपासून वंचित राहिले असल्याचे ॲड. बनवस्कर यांनी सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पदवीधर मतदारांनी सद्सद्विवेक बुद्धीने योग्य उमेदवारास पहिल्या पसंतीचे मतदान करावे व मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
No Comment! Be the first one.