कन्या पूजनावेळी ना. पंकजाताई मुंडे भावूक ; सर्व कन्यांसाठी केली देवीकडे प्रार्थना
लोकार्थ प्रतिनिधी परळी
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे आणि माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत आज दुर्गाष्टमी निमित्त १२१ कन्या पूजन आणि महिषासूर मर्दिनी सामुहिक स्त्रोत्र पठणाचा आगळावेगळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. स्त्रोत्र पठणावेळी शेकडो कन्यांची उर्जा पाहून त्यांना शुभेच्छा देताना ना. पंकजाताईंच्या भावना अनावर झाल्या, त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत.या सर्व कन्यांना ईश्वराने खूप खूप शक्ती द्यावी अशी प्रार्थना त्यांनी केली.
नवरात्र महोत्सव आणि दुर्गाष्टमीचे औचित्य साधून वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदीराच्या पायथ्याशी असलेल्या वक्रेश्वर मंदिरात आज प्रभू वैद्यनाथ सेवा समितीच्या वतीने १२१ कन्यांचे पूजन आणि महिषासूर मर्दिनी सामुहिक स्त्रोत्र पठणाचे आयोजन करण्यात आले होते. ना. पंकजाताई मुंडे व डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी मंत्रोच्चाराच्या घोषात कन्या पूजन केले. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या पाय-यावर या कन्यांनी अतिशय सुरेल आवाजात म्हटलेल्या महिषासूर मर्दिनी सामुहिक स्त्रोत पठणात त्यांनी सहभाग घेतला. स्त्रोत्र पठणानंतर कन्या समोर बोलताना, ‘तुम्ही इतके सुंदर स्त्रोत्र म्हटले आहे की, कोणतीही वाईट नजर तुमच्यावर पडू नये, तुम्हाला ईश्वराने खूप खूप शक्ती द्यावी अशी प्रार्थना करताना ना. पंकजाताई मुंडेंना भावना अनावर झाल्या, त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. प्रभू वैद्यनाथ सेवा समितीने घेतलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल आयोजक ॲड अरूण पाठक, कुलभूषण जैन, योगेश मेनकुदळे, सुशील हरंगुळे, राम पेन्टेवार, वैजनाथ रेकने, योगेश पांडकर या कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.
त्रिशूळ, डमरू प्रतिकृतीचे केले अनावरण
वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या प्रवेशद्वारावर मंदिर देवस्थान समितीने उभारलेल्या त्रिशूळ, डमरू प्रतिकृतीचे अनावरण ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. मंदिर समितीचे राजेश देशमुख, भाजप नेते जुगलकिशोर लोहिया, शहर मंडलाध्यक्ष उमाताई समशेट्टे, वैद्यनाथ बॅकेचे उपाध्यक्ष रमेश कराड तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





No Comment! Be the first one.