संयुक्त मोहिमेत पाच गुन्हे दाखल; ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त
लोकार्थ प्रतिनिधी किशोर जाधव
पिशोर : पोलीस ठाणे पिशोर व सहाय्यक पोलीस अधीक्षक कार्यालय, कन्नड यांच्या संयुक्त पथकाने दि. १६ व १७ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबवत अवैध दारूविक्री आणि मटका जुगाराविरोधात धडक कारवाई केली. या मोहिमेत एकूण पाच गुन्हे दाखल करून ८८ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामडी, वासडी येथील तिरंगा ढाबा परिसर आणि आडगाव येथे अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करण्यात आली. यात १३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार तीन गुन्हे दाखल करण्यात आले.
तसेच चिंचोली लिंबाजी येथील खंडोबा महाराज मंदिराजवळील बाजार परिसर आणि बसस्थानकाजवळील कोलंबी-मक्ता रस्त्यावरील एका शटरमध्ये सुरू असलेल्या मटका जुगारावर छापे टाकण्यात आले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा ७४ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या आदेशानुसार, त्यांच्या कार्यालयातील पोलीस अंमलदार मयूर वाळुंजकर, घुगे व जोनवाल तसेच पिशोर पोलीस ठाण्याचे सपोनि सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सफौ भताने, पोना बरडे, पोहेकॉ इंगळे व पोशी विजय राजपूत यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली.
अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी राबविलेल्या या विशेष मोहिमेमुळे परिसरातील अवैध दारूविक्री व जुगार व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
No Comment! Be the first one.