वडीगोद्रीतील अपघातांची मालिका सुरूच; पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
लोकार्थ प्रतिनिधी पंकज पवार
अंबड : धुळे-सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ बंद करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या बॅरिकेडला दुचाकी धडकल्याने एक जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. बबन काळे (वय ५०) रा. पारुंडी, ता. पैठण, असे मृताचे नाव असून बद्रीनाथ आदमाने (वय ५१, रा. पारुंडी, ता. पैठण) हे जखमी झाले आहेत.
धुळे-सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री येथील एका बाजूच्या उड्डाणपुलाला तडे गेल्याने गेल्या दोन महिन्यांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, वाहतूक सर्व्हिस रोडने वळविण्यात आली आहे. पुलाच्या सुरुवातीला बॅरिकेड लावण्यात आले आहेत.
मात्र, या मार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना बंद पुलाचा अंदाज न आल्याने बॅरिकेडला धडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात होऊन वाहनचालक जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे याच ठिकाणी एका कारने बॅरिकेडला धडक दिली होती. या घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी कारचे मोठे नुकसान झाले.
महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने बंद पुलाच्या ठिकाणी सुरक्षित वाहतूक व्यवस्थेची उपाययोजना करावी आणि उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांतून होत आहे.



No Comment! Be the first one.