मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक अरविंद देशमुख आक्रमक, निवडणूक आली की मराठा तरुण आठवतो…
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
छत्रपती संभाजीनगर – पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली की आ. सतीश चव्हाण यांना मराठा तरुण आठवतात… ३ वेळेस पदवीधरांचे आमदार राहूनही चव्हाण यांनी समाजाच्या तरुणांसाठी काय केले, हे सांगावे… मराठा तरुणांनीही त्यांना जाब विचारायला हवा, असे टीकास्त्र मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अरविंद देशमुख यांनी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यावर सोडले आहे.
सत्तेसाठी भूमिका बदलत राहणाऱ्या सतीश चव्हाणांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यातही कधी भूमिका स्पष्ट केली नाही. संस्थाचालकांना लक्ष्मीदर्शन दिले, की त्या संस्थेतील पदवीधर आपल्या बाजूने करून घ्यायचे अशी आजवर त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. विद्यार्थी, बेरोजगारांसाठी चव्हाण हे कधीच रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले नाही. त्यांना ३ वेळेस निवडून देऊनही त्यांनी मराठा समाजाच्याच काय, पण कोणत्याही समाजाच्या पदवीधरांसाठी काही केले असेल तर त्यांनी सांगावे, असे आव्हानही देशमुख यांनी दिले आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्यातही त्यांची भूमिका कधीच समाजाच्या हिताची राहिली नाही. त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये किती मराठा विद्यार्थ्यांचे शुल्क माफ केले हे त्यांनी सांगावे, असा खोचक प्रश्नही देशमुख यांनी केला आहे.
अरविंद देशमुख यांनी उपस्थित केलेले प्रश्न!
-मराठवाड्यातील बेरोजगार पदवीधरांसाठी किंवा रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी चव्हाण यांनी विधान परिषदेत किती वेळा आवाज उठवला?
-एमपीएससी (MPSC) परीक्षांचे रखडलेले निकाल, वयोमर्यादेचा प्रश्न किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा व इतर बहुजन तरुणांच्या प्रश्नांवर ते कधी रस्त्यावर उतरले का?
-मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलना दरम्यान सतीश चव्हाण यांची नेमकी काय भूमिका होती?
समाजातील तरुणांवर गुन्हे दाखल झाले किंवा उपोषणे झाली, तेव्हा चव्हाण यांनी लोकप्रतिनिधी म्हणून तरुणांची भेट घेतली का?
-सतीश चव्हाण यांच्या स्वतःच्या किंवा त्यांच्याशी संबंधित शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा- गरजू पदवीधरांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सवलती दिल्या गेल्या का?
No Comment! Be the first one.