कार्तिक राजगुरु/कन्नड प्रतिनिधी
कन्नड तालुक्यातील बहिरगाव येथील रामकृष्ण विष्णू दापके यांच्या बहिरगाव – भोकनगाव रोडवरील गट क्रमांक १०२ मधील शेतात मध्यरात्री बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात एक मेंढी जागीच ठार झाली असून, एक मेंढी गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेंढपाळ यांनी रात्री मेंढ्या शेतातील जाळीत ठेवल्या होत्या. रात्री सुमारे ३ वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने जाळीत घुसून मेंढ्यांवर हल्ला चढवला. बिबट्याने एका मेंढीच्या मानेला चावा घेतल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या मेंढीवरही हल्ला करून ती जखमी झाली आहे मध्यरात्री मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मेंढपाळ व शेतकरी जागे झाले. त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून अंधारात पळ काढला.
सध्या दुष्काळी परिस्थितीत मेंढपाळ वणवण फिरत, गावोगावी पायपीट करत आपल्या मेंढ्या जगवत आहेत. पाऊस कमी झाल्याने रानात चारा नाही, पाण्याची टंचाई आहे. चाऱ्यासाठी दररोज १०-१५ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. त
अशा हलाखीच्या परिस्थितीत बिबट्याच्या हल्ल्यामुळे होणारे नुकसान मेंढपाळांना आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे मोडून काढणारे ठरत आहे. एक मेंढी म्हणजे मेंढपाळ कुटुंबाचा महिन्याभराचा उदरनिर्वाह.
चारा नाही, पाणी नाही, त्यात बिबट्याने मेंढ्या मारल्या तर आम्ही जगायचं कसं. अशी हतबल प्रतिक्रिया यावेळी मेंढपाळांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे बहिरगाव परिसरातील शेतकरी, मेंढपाळ आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा होत्या. आता मध्यरात्री जाळीत घुसून प्रत्यक्ष हल्ला झाल्याने भीती आणखी वाढली आहे. रात्री शेतात, शेतवस्तीवर जनावरे ठेवणेही आता धोकादायक झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली असून, वनविभागाने पंचनामा केला आहे. मेंढपाळाला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी परिसरात तातडीने पिंजरा लावावा, वनविभागाने रात्रीची गस्त वाढवावी,अशी मागणी होत आहे.

No Comment! Be the first one.