शासनाने दुष्काळ जाहीर केला, मात्र पाटबंधारे विभागाचे पाणी व्यवस्थापन कोलमडले? कालव्याच्या स्वच्छतेपासून देखरेखीपर्यंत चौकशीची मागणी
प्रतिनिधी सुशिल गायकवाड पूर्णा
शासनाने दुष्काळ जाहीर केलेला असताना परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील सुरवाडी शिवारात कालवा ओव्हरफ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे शेतकरी पिके वाचविण्यासाठी पाण्याची प्रतीक्षा करीत आहेत, तर दुसरीकडे कालव्यातून पाण्याची अशी नासाडी होत असल्याने परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. दुष्काळाच्या काळात पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची जबाबदारी असलेल्या पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवरच या घटनेने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
कालव्याची नियमित स्वच्छता करण्यात आली होती का? गाळ, झाडेझुडपे आणि इतर अडथळे काढण्यात आले होते का? कालव्याच्या स्वच्छतेचे काम प्रत्यक्षात झाले असेल, तर त्याचे टेंडर कोणत्या एजन्सीला देण्यात आले होते? संबंधित एजन्सीने काम नियमानुसार पूर्ण केले का? कामाची पाहणी करून देयके मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती तपासली होती का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
दुष्काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना लाखो लिटर पाणी वाया जाणे ही साधी बाब नाही. कालवा ओव्हरफ्लो होण्यामागे तांत्रिक त्रुटी, स्वच्छतेतील निष्काळजीपणा की पाणी वितरणातील नियोजनाचा अभाव आहे, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी ढकलून वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोकळे सोडू नये, अशीही नागरिकांची भूमिका आहे.
दोषी तंत्रज्ञ, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करा! कालव्याच्या स्वच्छतेसाठी दिलेल्या टेंडरची कागदपत्रे, प्रत्यक्ष केलेले काम, कामाची गुणवत्ता, पाहणी अहवाल आणि पाणी वितरणाचे नियोजन तपासण्यात यावे. दोषी आढळणाऱ्या एजन्सीसह संबंधित तंत्रज्ञ, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारे पाण्याची नासाडी होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
No Comment! Be the first one.