१,३५० लोकसंख्येच्या गावात मोजकीच वृद्ध मंडळी; पाणी, चारा आणि रोजगाराअभावी ग्रामस्थांचे स्थलांतर
लोकार्थ प्रतिनिधी शरद गर्जे अष्टि
भीषण दुष्काळामुळे पोटच्या लेकरांना मागे ठेवून आई-वडिलांना ऊसतोडणीसाठी गाव सोडावं लागत आहे. कुठे पिण्यासाठी पाणी नाही, तर कुठे जनावरांसाठी चारा आणि हाताला कामही नाही. ही विदारक परिस्थिती आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या खडकवाडी गावाची. दुष्काळामुळे गावातील बहुतांश कुटुंबांनी स्थलांतर केलं असून, गावात मोजकीच वृद्ध मंडळी उरली आहेत. चिमुकल्या मुलांची आई-वडिलांपासून झालेली ताटातूट मन हेलावून टाकणारी आहे.
दुष्काळाची तीव्रता किती भयानक असू शकते, याचं वास्तव खडकवाडी गावात पाहायला मिळत आहे. सुमारे १,३५० लोकसंख्या असलेल्या या गावात पाण्याची टंचाई, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराचा अभाव यामुळे ग्रामस्थांना घरदार सोडून स्थलांतर करावं लागलं आहे. ऊसतोडणीसाठी अनेक कुटुंबं बाहेर गेल्याने गावातील घरांना कुलूप लागलं असून, मोजकीच वृद्ध मंडळी गावात उरली आहेत.
“इथं पाणी नाही म्हणून आई-वडील मला मावशीजवळ सोडून गेलेत,” अशी भावनिक व्यथा चिमुकल्या श्रेया गर्जेने मांडली. दुष्काळामुळे लहान मुलांना आई-वडिलांपासून दूर राहण्याची वेळ आली आहे.
गावात पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी दोन-दोन किलोमीटरपर्यंत भटकंती करूनही पाणी मिळत नसल्याची व्यथा ग्रामस्थ सांगत आहेत. मुलं ऊसतोडणीसाठी बाहेर गेल्याने नातवंडांसह घरी राहिलेल्या वृद्धांना उदरनिर्वाहाची चिंता सतावत आहे. घरात केवळ दोन पायल्या गहू शिल्लक असून, ते किती दिवस पुरणार, असा सवाल सुमनबाई सांगळे यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने दुष्काळ जाहीर केला असला, तरी आवश्यक उपाययोजना होत नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राजकमल गर्जे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खडकवाडी गाव दत्तक घेऊन गावाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं, अशी मागणी केली आहे.
दुष्काळ केवळ पाण्याचा प्रश्न राहिलेला नाही, तर त्याने कुटुंबांची ताटातूट आणि मुलांच्या बालपणावरही परिणाम केला आहे. खडकवाडीतील ग्रामस्थांना पाणी, चारा आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कोणती पावलं उचलणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
No Comment! Be the first one.