टुडे इको तपासणी शिबिरात पहिल्याच दिवशी ६० बालकांची तपासणी; ४७ बालकांवर होणार मोफत शस्त्रक्रिया**
लोकार्थ प्रतिनिधी अक्षय थिगळे, बुलढाणा
बुलढाणा – आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना मिळावा, यासाठी राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) तसेच केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत (PM-JAY) रोबोटिक सर्जरीचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
बुलढाणा येथील राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोबोटिक सर्जरीचा शुभारंभ, टुडे इको तपासणी शिबिर आणि एनएबीएल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार संजय गायकवाड, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त महानिदेशक डॉ. माधुरी बरसगडे, उपनिदेशक डॉ. मेघा खोब्रागडे, एनएबीएल प्रशिक्षक डॉ. गायत्री व डॉ. श्वेता सिन्हा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, जागतिक ख्यातीचे रोबोटिक सर्जन डॉ. सुधीर श्रीवास्तव, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, रोबोटिक सर्जन डॉ. गिरीश बक्षी, रोबोटिक कॅन्सर चिकित्सा तज्ज्ञ डॉ. अर्चना राठोड, ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे हृदयशल्यचिकित्सक डॉ. आशुतोष सिंह तसेच एस.एस. मंत्रा रोबोटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास उपस्थित होते.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांनी कार्यक्रमाची माहिती देतानाच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेतला. डॉ. गिरीश बक्षी, आमदार संजय गायकवाड आणि मंगेश चिवटे यांनी रोबोटिक सर्जरीचा शासकीय आरोग्य योजनांमध्ये समावेश झाल्यास गोरगरीब रुग्णांना मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बुलढाण्यासारख्या दुर्गम व मागास भागात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे ही महत्त्वाची बाब असून, येथे रोबोटिक सर्जरी प्रशिक्षण केंद्रही सुरू करावे, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, आज प्रत्येक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रातही या तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक अचूक, सुरक्षित आणि परिणामकारक होत आहेत. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या शरीराला कमी इजा होते, वेदना कमी होतात आणि शस्त्रक्रियेतील अचूकता वाढते. भारतीय बनावटीच्या ‘मेड इन इंडिया’ तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.
आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एस.एस. मंत्रा रोबोटिक्स कंपनीने सुमारे १६ कोटी रुपये किमतीचा भारतीय बनावटीचा रोबोटिक सर्जिकल रोबोट राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिला आहे. या रोबोटच्या माध्यमातून आज पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. जागतिक ख्यातीचे रोबोटिक सर्जन डॉ. सुधीर श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आयुष पद्धतीतील उपचारांसाठीही भारतीय बनावटीचा रोबोट विकसित करण्याची इच्छा केंद्रीय मंत्री जाधव यांनी एस.एस. मंत्रा रोबोटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास यांच्याकडे व्यक्त केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुष क्षेत्रासाठी ‘सुश्रुत’ नावाचा रोबोट विकसित करण्याची तयारी कंपनीने दर्शविली.
राजमाता वैद्यकीय महाविद्यालयात पहिली रोबोटिक सर्जरी यशस्वी
राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. भारतातील रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रवर्तक आणि जागतिक ख्यातीचे शल्यचिकित्सक डॉ. सुधीर श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत शिवशंकर इंगळे यांच्या हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी राज्यातील अनेक नामवंत शल्यचिकित्सकांनी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या शस्त्रक्रियेची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहून समजून घेतली.
टुडे इको शिबिरात ६० बालकांची तपासणी; ४७ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहांतर्गत जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया उपक्रम राबविण्यात येत आहे. लहान बालकांच्या हृदयातील जन्मजात दोषांचे निदान करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्याच्या उद्देशाने २८ व २९ नोव्हेंबर रोजी राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात टुडे इको तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या हृदयविकार तज्ज्ञांकडून बालकांची तपासणी करण्यात येत आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी २८ नोव्हेंबर रोजी एकूण ६० बालकांची इको तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४७ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची टीम कार्यरत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, प्राध्यापक तसेच आयोजन समितीचे प्रमुख डॉ. अजित शिरसाठ यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No Comment! Be the first one.