पैठणमध्ये तब्बल २-३ तास तणाव; पोलिसांनी धाव घेत केली अधिकाऱ्यांची सुटका
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
पैठण शहरात वाळू तस्करीविरोधात कारवाई करण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील आरटीओ पथकाला वाळू तस्करांनी घेराव घातल्याची घटना आज दुपारी घडली. संजय ऑटो पेट्रोल पंपासमोर वाळूने भरलेले हायवा वाहन पकडून कारवाई सुरू असतानाच काही जणांनी आरटीओ पथकाला घेरल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरटीओच्या पथकाला जवळपास दोन ते तीन तास घेराव घालून ठेवण्यात आले होते. या घटनेची माहिती पैठण पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आरटीओच्या अधिकाऱ्यांची सुटका केली.
दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याची चर्चा पैठण शहरात सुरू आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा दावा काही उपस्थित नागरिकांनी ‘लोकार्थ’ प्रतिनिधीशी बोलताना केला.
मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या संपूर्ण घटनेनंतर आरटीओ पथकाला घेराव घालणाऱ्यांविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

No Comment! Be the first one.