आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दाखविलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत कथित ऑडिओ क्लिप दाखविल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये दिल्याचा कथित उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरही प्रसारित होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यात यावी, त्यामधील संभाषणात ऐकू येणाऱ्या महिलेची ओळख निश्चित करावी, तसेच ही ऑडिओ क्लिप कोणी तयार केली आणि ती सोशल मीडियावर कोणी प्रसारित केली, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित
या निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, तालुकाप्रमुख भगवानराव अंभोरे, युवासेना जिल्हाप्रमुख अजय कदम, युवासेना लोकसभा व विधानसभा स्तरावरील पदाधिकारी, शुभम टकाळे, महादेव वाघ, राहुल गवारे, भागवत काळे, प्रमोद वाघमारे, नगरसेवक निखिल पगारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित ऑडिओ क्लिपची अधिकृत तपासणी होऊन वस्तुस्थिती समोर यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
No Comment! Be the first one.