लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : बुद्ध लेणी येथे अशोका विजया दशमी आणि ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा देऊन ७० वर्षे झाली, मात्र आपण किती पुढे गेलो, याचे आत्मपरीक्षण करून चिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. स्वीकारलेल्या धम्माचा जाहीरपणे प्रचार-प्रसार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. बुद्ध लेणीच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी भन्तेजींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जावे, आपणही त्यांच्यासोबत येऊ, अशी ग्वाही आंबेडकर यांनी दिली. भन्तेजी हे चळवळीचे नायक असल्याचेही ते म्हणाले. पैसा स्वातंत्र्य देऊ शकत नाही, तर आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो, असे सांगत त्यांनी परस्परांशी संवाद साधण्याचे आणि अन्यायाविरोधात लढण्याचे आवाहन केले. आजच्या काळात मतदान हे स्वातंत्र्याचे प्रतीक असून, मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करणे ही प्रत्येक भारतीयाची, विशेषतः फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, रुपचंद गाडेकर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, करुणा जाधव, प्रशांत बोर्डे, शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, युवा शहराध्यक्ष राहुल मकासरे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No Comment! Be the first one.