प्रेरणादायी | अवयवदानातून जीवदान; ग्रीन कॉरिडॉरने सोलापुरातून हृदय चेन्नईला रवाना
लोकार्थ प्रतिनिधी मोहोळ
मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी (अनगर) येथील अवघ्या आठ वर्षांच्या आयुष महेश थिटे या चिमुकल्याच्या अपघाती निधनानंतर थिटे कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे चार रुग्णांना नवे जीवन मिळणार आहे. आयुषचे हृदय चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन वर्षांच्या रशियन बालकावर प्रत्यारोपित करण्यासाठी रवाना करण्यात आले.
खेळताना झालेल्या अपघातात आयुष गंभीर जखमी झाला होता. अनगर येथील डॉ. संतोष गुजरे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सोलापूर येथील सीएनएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान २८ सप्टेंबर रोजी डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत घोषित केले.
यानंतर डॉ. संतोष गुजरे आणि डॉ. प्रसन्न कासेगावकर यांच्या समुपदेशनानंतर आयुषचे वडील महेश थिटे आणि कुटुंबीयांनी दुःखाच्या प्रसंगीही अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला. आपल्या मुलाच्या अवयवांमुळे इतरांचे प्राण वाचावेत, या भावनेतून त्यांनी अवयवदानास संमती दिली.
पुणे झेडटीसीसी, सोहा आणि नोटा यांच्या समन्वयातून आयुषच्या अवयवांचे वाटप करण्यात आले. त्याचे यकृत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकला, तर दोन्ही मूत्रपिंडे बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल आणि पुण्यातील केईएम हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी देण्यात आली.
पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन
पुण्यात हृदयासाठी योग्य रुग्ण उपलब्ध नसल्याने आयुषचे हृदय चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन वर्षांच्या रशियन बालकासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. हृदय वेळेत चेन्नईला पोहोचावे यासाठी सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी सोलापूर विमानतळापर्यंत विशेष ग्रीन कॉरिडॉर तयार केला. पोलिसांच्या नियोजनामुळे हृदय विशेष विमान रुग्णवाहिकेतून विनाअडथळा चेन्नईला रवाना करण्यात आले.
दुःखातही माणुसकीचा निर्णय
एकुलत्या एक मुलाच्या निधनाचे असह्य दुःख असतानाही थिटे कुटुंबीयांनी अवयवदानाला संमती देऊन माणुसकीचा आदर्श निर्माण केला. आयुषच्या अवयवांमुळे चार रुग्णांना नवजीवनाची आशा मिळाली असून, त्याचे हृदय तीन वर्षांच्या रशियन बालकासाठी जीवनाची नवी आशा ठरले आहे.
No Comment! Be the first one.