दही अंतरवालीतील सरपंच व ग्रामसेवकाविरोधात गंभीर आरोप; चौकशी करून कठोर कारवाईची मागणी
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे जालना
घनसावंगी तालुक्यातील दही अंतरवाली येथे गावातील विविध विकासकामांच्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या व्यक्तीला सरपंच व ग्रामसेवकाकडून विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दही अंतरवाली गावातील खराब रस्ते, अस्वच्छता, नियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांसाठी संबंधित व्यक्तीने अनेक दिवस उपोषण केले. गावाच्या विकासाच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने उपोषण करणाऱ्या व्यक्तीला विरोध का करण्यात आला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
गावातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी कोणी आवाज उठवत असेल तर त्याचा आवाज दाबण्याऐवजी त्याच्या मागण्यांची दखल घेणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गावाचा विकास करायचा नाही का, असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात येत आहे. गावातील रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर त्यांना विरोध केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर असल्याने या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, संबंधितांचे जबाब नोंदवावेत आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दही अंतरवाली गावातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
No Comment! Be the first one.