दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्यांसाठी प्रशासनाची बैठक घेणार; खासदार संदीपान भुमरे यांची माहिती
लोकार्थ रिपोर्ट चंद्रकांत अंबिलवादे पैठण
श्रीरेणुकादेवी-शरद सहकारी साखर कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधिवत पूजन करून ऊसाची मोळी गव्हाणीत टाकण्यात आली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पैठणसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी चारा छावण्या उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती खासदार संदीपान भुमरे यांनी यावेळी दिली.
चेअरमन आमदार विलास बापू भुमरे यांच्या प्रयत्नातून कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारखान्याचे कार्यकारी संचालक नामदेव बावडकर, शुगर मिलचे दत्तात्रय रेवडकर आणि दासूभाऊ रेवडकर यांनी मागील गळीत हंगामातील कारखान्याच्या प्रगतीची माहिती उपस्थितांना दिली.
श्रीरेणुकादेवी-शरद साखर कारखान्याने सर्वांच्या अगोदर २९०० रुपयांचा ऊस दर जाहीर केला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हा आपला स्वतःचा कारखाना समजून जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा, असे आवाहन खासदार संदीपान भुमरे यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन नंदकुमार पठाडे, संचालक राजू नाना भुमरे, आप्पासाहेब निर्मळ, अफसरभाई शेख यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस मुकादम आणि ऊसतोडणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Comment! Be the first one.