ऊसदराबाबत आ.डॉ. राहुल पाटील यांच्या आश्वासनानंतर निर्णय
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
ऊस उत्पादक शेतकर्यांच्या थकीत रकमेसह नवीन दरासंदर्भात निश्चितपणे समाधानकारक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी सात दिवसांपासून सुरु असणारे धरणे आंदोलन मंगळवारी दि.13 रोजी मागे घेतले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स इंडस्ट्री अंतर्गत ऊस उत्पादक शेतकर्यांना 300 रुपये वितरित करण्यासह नवीन दरा संदर्भात कारखाना प्रशासनाने निर्णय घ्यावा, या मागणीकरीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या सात दिवसांपासून लाक्षणिक धरणे आंदोलनास बसले होते. पोलिस प्रशासनाने मध्यस्ती केल्यानंतर आ. डॉ. पाटील यांनी मंगळवारी या आंदोलनकर्त्यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत चर्चा केली. ऊस उत्पादक शेतकर्यांना 300 रुपये वितरित करण्यासह ऊसाच्या दरासंदर्भात बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात निश्चित योग्य निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन दिले.
आ.पाटील यांनी हा कारखाना सुस्थितीत येऊ द्या, आपण हा कारखाना चांगल्या पध्दतीने उभा करु व ऊस उत्पादकांना अधिकाधिक लाभ कसा मिळेल, या दृष्टीने हिताचे निर्णय घेऊ, असे म्हटले.
जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने प्रयत्नरत राहु, या कारखान्याच्या माध्यमातून आपण कधीही एक रुपयाही नफा कमविला नाही, कमविणारसुध्दा नाही. आपण ऊस उत्पादक शेतकर्यांच्या विकासाच्या दृष्टीनेच सातत्याने प्रयत्नरत राहु, अशी ग्वाहीही दिली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले धरणे आंदोलन स्थगित केले
No Comment! Be the first one.