परक्यांनी दिला चिमुकल्याला अखेरचा निरोप!
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : ज्या चिमुकल्याला आईच्या कुशीची ऊब आणि वडिलांच्या मायेचा आधार मिळायला हवा होता, त्याच अवघ्या एक दिवसाच्या बाळाला नवरात्र सुरू असल्याचे कारण देत जन्मदात्यांनी हात लावण्यासही नकार दिला. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली.
जन्मानंतर अवघ्या २४ तासांत बाळाचा मृत्यू झाला. मात्र, अंत्यसंस्कारासाठी पुढे येण्याऐवजी पालकांनी स्मशानभूमी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. देवराव गायकवाड आणि रामेश्वर साबळे यांनी रुग्णालयात जाऊन बाळाला कुशीत घेतले, दुचाकीवरून स्मशानभूमीत आणले आणि त्याचा दफनविधी केला. जन्मदात्या पित्याने बाजूला उभे राहून हा प्रसंग पाहिला. बाळावर थोडे दूध टाकून तो निघून गेला, असे वृत्त आहे.
जन्मदात्यांनी नाकारलेल्या त्या निष्पाप जीवाला परक्यांनी मायेने कुशीत घेतले. मृत्यूशी रोज सामना करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचेही बाळाचा दफनविधी करताना डोळे पाणावले. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते मोठे असते, याची जाणीव करून देणाऱ्या या घटनेने मन सुन्न झाले.
No Comment! Be the first one.