गंगापूर पोलिसांची पहाटे धडक कारवाई
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : कपाशीच्या पिकाच्या आड गांजासदृश झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले जात असल्याचा प्रकार अगरकानडगाव शिवारात उघडकीस आला आहे. गंगापूर पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत तब्बल ४४ गांजासदृश झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांचे एकूण वजन ५९.६८ किलो आणि किंमत ५ लाख ९६ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी कानडगाव येथील संजू नामदेव बर्डे (वय ५५) यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीवरून शेतात धाड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना अगरकानडगाव शिवारातील जलसंपादित जमिनीवर असलेल्या कपाशीच्या शेतात गांजासदृश झाडांची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाईचे नियोजन केले. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास पथकाने संबंधित शेतात धाड टाकली. तपासणीदरम्यान कपाशीच्या पिकामध्ये ठिकठिकाणी लहान-मोठ्या आकाराची गांजासदृश झाडे आढळून आली.
पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ४४ झाडे उपटून जप्त केली. या कारवाईदरम्यान न्यायवैद्यक शास्त्र पथकाने विश्लेषणासाठी दोन झाडे आणि झाडांजवळील मातीचा नमुना घेतला. उर्वरित ४२ झाडांचे स्वतंत्र गट करून गोण्यांमध्ये पॅकिंग करण्यात आले. जप्त केलेल्या झाडांचे वजन काट्यावर करण्यात आले असून, एकूण वजन ५९.६८ किलो नोंदविण्यात आले आहे.
पाच गोण्यांमध्ये झाडांचे वर्गीकरण
पंचनाम्यात नमूद केल्यानुसार, नमुना तपासणीसाठी घेतलेल्या दोन झाडांचे वजन ९.७६२ किलो असून त्यांची किंमत ९७ हजार ६२० रुपये नमूद करण्यात आली आहे. उर्वरित झाडांपैकी तीन झाडांचे वजन ७.३४२ किलो, दहा झाडांचे ८.६७२ किलो, १४ झाडांचे १०.०४४ किलो, सात झाडांचे १०.५१८ किलो आणि आठ झाडांचे १३.३४२ किलो असे वजन नोंदविण्यात आले आहे. या पाच गटांतील झाडे स्वतंत्र गोण्यांमध्ये भरून त्यांना पी-१ ते पी-५ असे क्रमांक देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या झाडांची एकूण किंमत ५ लाख ९६ हजार ८०० रुपये आहे. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या उपस्थितीत, शासकीय पंच आणि संबंधित अधिकाऱ्यांसमक्ष करण्यात आला.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
संजू नामदेव बर्डे यांनी जलसंपादित जमिनीवरील कपाशीच्या शेतात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासकीय परवानगीशिवाय गांजासदृश झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन व जोपासना केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विश्वजित भागवतराव फरताडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली.
गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम २०(अ), २०(ब)(१) आणि २०(ब)(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ ऑक्टोबर रोजी रात्री ९.५४ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
संयुक्त पथकाची कारवाई
या कारवाईत पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाखरे, पोलीस अंमलदार मनोज नवले, अनिरुद्ध शिंदे, कैलास राठोड, अर्जुन सिंगल, अजित नागलोड, तसेच होमगार्ड सूरज गायकवाड, विठ्ठल पवार, प्रकाश आघाडे, करण साळुंके, बबलू लगड, रामेश्वर मंडलिक आणि सचिन प्रधान सहभागी झाले. महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी मीना सुकटे, तलाठी, शासकीय पंच, वजनमाप कर्मचारी आणि गंगापूर येथील न्यायवैद्यक शास्त्र पथकानेही कारवाईत सहभाग घेतला.
कपाशीच्या शेतात गांजासदृश झाडांची लागवड आढळल्याने आता या झाडांच्या नमुन्यांच्या न्यायवैद्यक तपासणीच्या निष्कर्षांकडे लक्ष लागले आहे.

No Comment! Be the first one.