अष्टमीला भाविकांची प्रचंड गर्दी; मंदिराच्या विकासकामांची घेतली माहिती
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी रविवारी श्री रेणुकामाता सुवर्ण मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सतीश वैद्य यांनी राज्यपाल बागडे यांचा विशेष सत्कार करून मंदिराच्या प्रगतीची सविस्तर माहिती दिली. तसेच सामाजिक संकुल उभारणीच्या कामाची माहिती जाणून घेत राज्यपालांनी भविष्यातील उपक्रमांसाठी मौलिक सूचना केल्या. नवरात्रोत्सवात दररोज आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि नियोजनाचे त्यांनी कौतुक करून विश्वस्त मंडळाचे अभिनंदन केले.
यावेळी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी प्रशांत नांदेडकर, सुनील खोचे, जगन्नाथ उगले, मकरंद पुराणिक आदी उपस्थित होते. दरम्यान, रविवारी महाअष्टमीच्या निमित्ताने रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.

No Comment! Be the first one.