पैठण पोलिसांकडून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे
मायगाव (ता. पैठण) येथील गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांचे पथक कारवाईसाठी दाखल होताच वाळू खाली करून वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाविरुद्ध पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित हायवा वाहन जप्त केले आहे.
सोमवारी मायगाव येथील गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पैठण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी कारवाईसाठी दाखल झाले. पोलिसांना पाहताच पिवळ्या रंगाच्या हायवा वाहनातून वाळू खाली करून चालकाने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पोलिसांनी दोन ब्रास क्षमतेचा हायवा (क्रमांक MH-28 BB-9248) जप्त केला असून, चालक राहुल लक्ष्मण माळी (रा. मायगाव, ता. पैठण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजेंद्र जिवडे पुढील तपास करीत आहेत.
No Comment! Be the first one.