६० वर्षीय वृद्धाला फोनवर अश्लील शिवीगाळ अन् धमकी दुष्काळात फायनान्स कंपन्यांचा तगादा वाढला
एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त असताना, दुसरीकडे कर्ज वसुलीच्या नावाखाली फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेला छळ आणि मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चिंचखेड येथील एका ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन लोनच्या वसुलीसाठी फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, घरी माणसे पाठवून कर्ज वसूल करण्याची धमकी देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित वृद्धाने फायनान्स एजंटसोबत झालेल्या संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग पुराव्यादाखल देत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय..
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचखेड (ता. अंबड) येथील रहिवासी राम गोरखनाथ पारवे (वय ६० वर्ष, व्यवसाय मजुरी) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी दोन वर्षांपूर्वी एका फायनान्सकडून ऑनलाईन माध्यमातून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.त्यापैकी त्यांनी दरमहा ठरलेल्या हप्त्यांपैकी ३२ हप्ते वेळेत भरले असून, केवळ काही हप्ते बाकी राहिले होते.घटना घडली त्या दिवशी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास, राम पारवे घरी असताना त्यांच्या फोनवर कॉल आला. फोन करणाऱ्या फायनान्स प्रतिनिधीने “तुम्ही ऑफिसचे लोन थकवले आहे, पैसे का भरत नाही?” अशी विचारणा केली.घरात दुष्काळ, त्यात पत्नी आजारी यावर राम पारवे यांनी, “सध्या दुष्काळ असून हाताला काम नाही, त्यातच माझी पत्नी आजारी असल्याने व आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पैसे भरण्यास थोडा वेळ हवा आहे,” अशी गयावया करत विनंती केली. मात्र, फायनान्सच्या एजंटने त्यांची बिकट परिस्थिती समजून न घेता थेट फोनवरच अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
कॉल रेकॉर्डिंग पुरावा अन् घरी माणूस पाठवण्याची धमकी
संबंधित फायनान्स एजंटने केलेल्या अरेरावीची आणि शिवीगाळीची संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग पीडित ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली आहे. शिवीगाळ करून न थांबता, “जर तुम्ही पैसे भरले नाहीत, तर आम्ही तुमच्या घरी आमचे कर्मचारी पाठवून कोणत्याही पद्धतीने कर्ज वसूल करू,अशी थेट धमकी त्या एजंटने दिलीय…
याप्रकरणी पीडित राम गोरखनाथ पारवे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.
No Comment! Be the first one.