आयशर वाहनातून म्हशी आणि वगारांची वाहतूक; १३ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : पैठण-शेवगाव रोडवर जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनावर पैठण पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई केली. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आयशर वाहनातून जाफराबादी आणि गावठी जातीच्या म्हशी व वगारांना आखूड दोरीने बांधून वाहतूक केली जात होती. तसेच, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती.
याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस पथकाला पैठण-शेवगाव रोडवर तैनात केले. यावेळी एमएच ०७ एजे ६६३३ क्रमांकाच्या आयशर वाहनातून जनावरांची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
या कारवाईत तेरा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शेवगाव येथील नाईकवाडी मोहल्ल्यात राहणाऱ्या शेख हाजी फकीर मोहम्मद यांच्याविरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार लक्ष्मण पुरी करीत आहेत.

No Comment! Be the first one.