दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना आणखी मोठा फटका; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, महसूल विभागाकडून पंचनामा सुरू
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे
पैठण तालुक्यातील नवगाव शिवारात उसाच्या शेताला अचानक लागलेल्या भीषण आगीत १०० एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. आधीच दुष्काळाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर या आगीमुळे दुहेरी संकट ओढावले आहे.
नवगाव परिसरातील शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात काम करीत असताना कॅनललगत असलेल्या गट क्रमांक ४४५, ४४६ यासह परिसरातील अनेक उसाच्या शेतांमध्ये अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि पाहता पाहता मोठ्या क्षेत्रावरील उभा ऊस जळून खाक झाला.
घटनेची माहिती मिळताच पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी सुधाकर निकम यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक घटनास्थळी दाखल झाले असून, जळीत क्षेत्राचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे. ऊस जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, हे पंचनामा पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती आमदार विलास बापू भुमरे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक नामदेव बावडकर, शुगर मिलचे दत्तात्रय रेवडकर तसेच शेतकी विभागाचे पथक घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याची व्यवस्था केली.
घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राजेंद्र जिवडे यांच्यासह पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महसूल विभागाचा पंचनामा आणि पुढील तपासानंतर आगीचे कारण तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे.

No Comment! Be the first one.