पं. कैवल्यकुमार गुरव यांचे गायन
लोकार्थ प्रतिनिधी
शास्त्रीनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने शहरात सातत्याने दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे आयोजन नरक चतुर्दशीच्या दिवशी केले जाते . हे कार्यक्रमाचे 23 वे वर्ष आहे . शहरात दिवाळी पहाट प्रथम सुरू करण्याचा मान शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेला जातो . हा कार्यक्रम लोकवर्गणीतून केला जातो , असे असतानाही याचे सातत्य आणि या कार्यक्रमाचा श्रोतृवृंद हा कलाकारांना आणि रसिकांना समसमान समाधानाची आणि आनंदाची अनुभूती देणारा असतो .
यापूर्वीच्या कार्यक्रमातून अनेक दिग्गज गायक कलाकारांनी आपली कला सादर केली आहे . विशेष म्हणजे तरुण रसिकांचा उदंड प्रतिसाद या कार्यक्रमासाठी श्रोता आणि कार्यकर्ता अशा दोन्ही भूमिकेतून असतो .
या 23 व्या वर्षाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी पंडित कैवल्यकुमार गुरव यांना आमंत्रित करण्यात आले आहे . शास्त्रीय संगीता बरोबरच मराठी नाट्य संगीत आणि मराठी भक्ती संगीत , संतांचे अभंग तसेच दत्त संप्रदायातील पदे यावर पंडितजींची विशेष पकड असून रसाळ आणि मधुर स्वरातून व्यक्त होणारं गाणं हे त्यांच्या सादरीकरणाचे विशेष वैशिष्ट्य आहे . सुरुवातीला शास्त्रीय संगीत त्यानंतर नाट्यसंगीत आणि भक्ती संगीत असा हा कार्यक्रम खुलत जाणार आहे .
शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेच्या कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी तसेच दिवाळी पहाट कार्यक्रम संयोजन समितीचे सर्व सदस्य, प्रभागातील सर्व नगरसेवक आणि सोसायटीतील सर्व सभासद व त्यांचे कुटुंबीय आणि शहरातील तमाम संगीत रसिक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हा कार्यक्रम दरवर्षी साजरा होतो .
सामाजिक भान सांभाळत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष रॅम्प करून व्हीलचेअर द्वारे त्यांना रस्त्यापासून कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्याचे नियोजन संस्थेतर्फे करण्यात आले आहे .
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्याला कुठलीही प्रवेश शुल्क नाही .
नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबर 2026 रविवारी सकाळी 6 वाजता शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेच्या उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे .जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरविंद पाठक आणि सचिव पं. विश्वनाथ दाशरथे यांनी केले आहे .
No Comment! Be the first one.