सहाशे किलोमीटर दूर असलेल्या कुटुंबाचा शोध घेत स्वखर्चाने केली वाहनाची व्यवस्था
लोकार्थ प्रतिनिधी विजय चौधरी
खुलताबाद : घरापासून दूर, अनोळखी प्रदेशात वर्षभर भटकंती करणारा भोळसर ४० वर्षीय जीवन अखेर आपल्या माणसांपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाला निघाला. अंगावर मळलेले कपडे, वाढलेले केस-दाढी, राहण्यासाठी छप्पर नाही आणि पोट भरण्यासाठी मिळेल ते खाणे, अशी त्याची अवस्था झाली होती. भाषेची अडचण आणि कुटुंबीयांशी संपर्क तुटल्याने त्याच्या मदतीला कोणी पुढे येत नव्हते. मात्र, वेरूळ आणि कसाबखेडा येथील काही युवकांनी त्याच्याकडे माणुसकीच्या नजरेतून पाहिले आणि त्याला पुन्हा घरचा रस्ता दाखविण्याचा निर्धार केला. या युवकांच्या प्रयत्नांमुळे वर्षभरापासून घरापासून दूर असलेल्या जीवनला बुधवारी (दि. २८) आपल्या कुटुंबीयांकडे परतण्यासाठी मार्ग मिळाला. वेरूळ आणि कसाबखेडा परिसरात गेल्या वर्षभरापासून जीवन भटकत होता. रात्री उघड्यावर राहणे, मिळेल ते खाणे आणि परिसरात इकडेतिकडे फिरणे, असे त्याचे जीवन सुरू होते. वाढलेले केस-दाढी आणि मळलेल्या कपड्यांमुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. अनेक जण त्याच्याकडे पाहून दुर्लक्ष करत असताना काही युवकांना मात्र त्याच्या परिस्थितीची जाणीव झाली. एखाद्या व्यक्तीला केवळ अन्न-वस्त्र देण्यापेक्षा त्याला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचविणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ओळखले. कसाबखेडा येथील इलियास पठाण, अयाज शेख, फिरोज शेख, वेरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते मसीयोद्दीन सौदागर आणि खुलताबादचे नगराध्यक्ष अमेर पटेल यांनी पुढाकार घेत जीवनला मदतीचा हात दिला. त्याला स्वच्छ अंघोळ घालून नवीन कपडे देण्यात आले. त्याच्याशी संवाद साधून त्याच्या घराचा आणि कुटुंबीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, जीवन तेलुगू भाषेत बोलत असल्याने संवाद साधण्यात मोठी अडचण येत होती. – तेलुगू भाषेने जोडला घराचा धागा कसाबखेडा येथील युवकांची तेलंगणातील हैदराबाद येथील मोसंबीचे व्यापारी नबीसा शेख यांच्याशी ओळख होती. त्यांच्या मदतीने जीवनशी तेलुगू भाषेत संवाद साधण्यात आला. या संवादातून त्याचे नाव जीवन असून, तो तेलंगणा राज्यातील नंदनम, तालुका इनावोल, जिल्हा हनमाकोंडा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यात आला. वर्षभरापासून संपर्क तुटलेल्या या तरुणाला त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना अखेर दिशा मिळाली. स्वखर्चाने वाहनाची व्यवस्था जीवनला घरी पाठविण्यासाठी खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, शेख जाकीर आणि सिद्धार्थ सदावर्ते यांची भेट घेऊन रीतसर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. वेरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते मसीयोद्दीन अल्लाउद्दीन सौदागर यांनी स्वखर्चाने वाहनाची व्यवस्था केली. बुधवारी दुपारी दीड वाजता जीवनला सोबत घेऊन वेरूळ आणि कसाबखेडा येथील काही युवक तेलंगणाकडे रवाना झाले. सुमारे सहाशे किलोमीटर दूर असलेल्या आपल्या घराकडे जीवनचा प्रवास सुरू झाला. वर्षभर अनोळखी माणसांमध्ये आणि अनोळखी परिसरात दिवस काढणाऱ्या या तरुणाला आता आपल्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याच्या घरच्यांशी संपर्क साधून त्याला घरी पोहोचविण्यासाठी युवकांनी घेतलेला पुढाकार केवळ मदतीचा उपक्रम नसून माणुसकीचा जिवंत प्रत्यय ठरला आहे. माणुसकीला भाषेची सीमा नसते, हेच वेरूळ आणि कसाबखेडा येथील युवकांनी कृतीतून दाखवून दिले. अनोळखी व्यक्तीला आपले मानून त्याच्या घराचा शोध घेणे, त्याची काळजी घेणे आणि स्वखर्चाने त्याला कुटुंबापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
No Comment! Be the first one.