शेवता येथील माजी सरपंच प्रमिला गरड यांच्या पती विठ्ठल गरड यांचा मृत्यू; मुलाला शेतात आढळले वडील मृतावस्थेत
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे
पैठण तालुक्यातील शेवता येथे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २८) सायंकाळी उघडकीस आली. विठ्ठल उत्तमराव गरड (वय ५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेवता ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्रमिला गरड यांचे पती होते.
विठ्ठल गरड हे जायकवाडी जलफुगवटा परिसरातील शेवता शिवारातील गट क्रमांक १८ मधील आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी बुधवारी गेले होते. दुपारनंतर वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर विहिरीजवळील विद्युत पेटीतील स्टार्टरच्या साहाय्याने पंप सुरू करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. यात ते जागीच कोसळले.
दरम्यान, सायंकाळ होऊनही वडील घरी परतले नसल्याने त्यांचा मुलगा शेताकडे गेला. त्यावेळी विठ्ठल गरड हे स्टार्टरच्या पेटीजवळ पडलेल्या अवस्थेत आढळून आले. मुलाने तत्काळ ज्ञानदेव गरड, सरपंच अक्षय देशमुख यांच्यासह गावातील नागरिकांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. विठ्ठल गरड यांना तातडीने वाहनातून बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मा शाईन यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेने शेवता परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतातील विद्युत उपकरणे हाताळताना अधिक खबरदारी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
No Comment! Be the first one.