प्रादेशिक साखर सहसंचालक विलास जाधवर यांचा आदेश; सहाय्यक निबंधक बलराम नवथर यांच्याकडे कारखान्याची प्रशासकीय सूत्रे
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे
पैठण येथील श्रीसंत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी प्रकार समोर आला आहे. अनेक दिवसांपासून विविध वादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या श्रीसंत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान २१ सदस्यीय संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले आहे.
प्रादेशिक साखर सहसंचालक विलास जाधवर यांनी यासंदर्भात दि.१८ नोव्हेंबर रोजी आदेश दिले असून, संचालक मंडळ बरखास्त झाल्याने कारखान्याचे कामकाज पुढील एक वर्षासाठी पैठण तालुका सहाय्यक निबंधक बलराम नवथर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कारखान्याच्या कारभारातील कथित अनियमितता, शेतकरी व कामगारांचे थकीत वेतन तसेच सहकारी संस्थेच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका आणि संचालक मंडळाकडून कर्तव्यपालनात झालेली कसूर या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली.
विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी आमदार विलास बापू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून लढा उभारण्यात आला होता. याशिवाय कारखान्याशी कोणताही संबंध नसलेल्या कथित बोगस सभासदांची नावे सभासद यादीतून रद्द करण्याची मागणीही करण्यात आली होती. या सर्व घडामोडींनंतर संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय झाल्याने पैठण तालुक्याच्या सहकार आणि राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
बरखास्त झालेल्या २१ संचालकांची नावे पुढीलप्रमाणे
१) अक्षय सुदामराव शिसोदे
२) दत्तात्रय हरिभाऊ आमले
३) कचरू उत्तमराव बोबडे
४) दत्ता श्रीकिसन वाकडे
५) दिगंबर सटवाजी गोर्डे
६) तुषार काशिनाथ शिसोदे
७) प्रल्हाद कल्याणराव औटे
८) गणेश प्रल्हादराव घायाळ
९) आबासाहेब शेषराव मोरे
१०) एकनाथ बबन नवले
११) रविंद्र आबासाहेब बोडखे
१२) भरत किसनराव घायाळ
१३) प्रविणकुमार भरतराव घायाळ
१४) दीपक हरिचंद्र फंदाडे
१५) शिवाजी नाना जाधव
१६) बाबासाहेब एकनाथ खरात
१७) रमेश कचरू झिने
१८) विजया विक्रम घायाळ
१९) ताराबाई रामेश्वर घायाळ
२०) उषाबाई सुखदेव थोरात
२१) अनुराधा कैलास तुपकरी यांचा समावेश आहे.
संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर आता पुढील एक वर्ष कारखान्याचा कारभार प्रशासक बलराम मोहनराव नवथर यांच्या हाती राहणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या आगामी कामकाजाबरोबरच शेतकरी आणि कामगारांचे थकीत प्रश्न मार्गी लागतात का, तसेच सभासदत्वाबाबतच्या तक्रारींवर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण पैठण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.