दोन दिवसांपूर्वीच ग्रामस्थांचे आमरण उपोषण; पाण्याच्या शोधात गेलेल्या रतन घुगे यांच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
लोकार्थ प्रतिनिधी ए. आर. पटेल
अंबाजोगाई : गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असताना पाण्याच्या शोधात गेलेल्या ६० वर्षीय वृद्धाचा विहिरीत पडून गंभीर अपघात झाल्याची घटना केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे घडली. रतन घुगे असे जखमी वृद्धाचे नाव असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे, गावातील पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांना आवश्यक सूचना देत गावात पिण्याच्या पाण्यासाठी बोअर घेण्याचे नियोजन केले होते.
मात्र, पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली. आज सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रतन घुगे पाण्याच्या शोधात विहिरीकडे गेले होते. यावेळी अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना विहिरीबाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, केज तालुक्याप्रमाणेच अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांमध्येही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याचे समोर येत आहे. लाडेवडगावातील या घटनेमुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी होत आहे.
No Comment! Be the first one.