लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : सरकारी अभिलेखातील जुन्या खरेदीखताच्या आधारे बनावट दस्तऐवज तयार करून कोट्यवधींची जमीन हडपण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली असून, तपासात एकूण सात आरोपी निष्पन्न झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक-१ मध्ये १७ नोव्हेंबर २०२६ रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी सह दुय्यम निबंधक अधिकारी प्रवीणा माणिकचंद राठोड (वय ४४) यांच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी संगनमत करून सरकारी अभिलेखातील १९७९ मधील खरेदीखताच्या नोंदींचा गैरवापर केला. दस्त क्रमांक ६०२७/७९ संदर्भातील बनावट दस्तऐवज तयार करून मूळ मालकाच्या नावावर असलेली मौजे पोखरी येथील गट क्रमांक ६६ मधील ५.९९ हेक्टर जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात अब्दुल रशीद ऊर्फ डॉक्टर (वय ५८) आणि रवींद्र बाबुराव पवार (वय ३८) या दोघांना २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.२८ वाजता अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यात मोहन दगडू राठोड, नितीन मोहन राठोड, सागर राम आगळे, प्रतीक सुरेश कोल्हे आणि प्रशांत प्रकाश तांबे यांच्यासह इतर आरोपींची नावेही समोर आली आहेत.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गंभीरराव, पोलीस उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी सरकारी अभिलेखांचा वापर कसा झाला आणि या जमीन व्यवहारामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.

No Comment! Be the first one.