उदगीर, लातूर रोड, परळी, परभणी, हिंगोली आणि अकोला मार्गे रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना निवेदन
लोकार्थ प्रतिनिधी रवींद्र जोशी परळी वैजनाथ :
कल्याण-कर्नाटक आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांची उत्तर भारताशी थेट जोडणी व्हावी, यासाठी बिदर (कर्नाटक) ते अमृतसर (पंजाब) दरम्यान नवीन थेट एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, हिंगोली आणि अकोला या मार्गावरून ही रेल्वे सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रस्तावित रेल्वेमुळे मराठवाड्यातील अनेक शहरांना उत्तर भारत, पंजाब आणि दिल्लीशी थेट रेल्वे जोडणी मिळू शकणार आहे. विशेषतः विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, नोकरदार तसेच संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठी ही रेल्वे उपयुक्त ठरेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
या मागणीमागे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचाही महत्त्वाचा मुद्दा आहे. बिदर येथील गुरुद्वारा श्री नानक झिरा साहिब, नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब आणि अमृतसर येथील श्री हरमंदिर साहिब या शीख धर्मातील पवित्र स्थळांना जोडणारी रेल्वेसेवा उपलब्ध झाल्यास हजारो भाविकांची मोठी सोय होईल. सध्या या प्रवासासाठी भाविकांना वेगवेगळ्या स्थानकांवर रेल्वे बदलावी लागत असल्याने वेळ आणि श्रम खर्ची पडतात. याशिवाय परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही या रेल्वेचा लाभ होऊ शकतो.
उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ आणि हिंगोली या भागांतील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मर्यादित रेल्वे पर्याय उपलब्ध आहेत. प्रस्तावित रेल्वेमुळे या भागातील प्रवाशांना थेट उत्तर भारतात जाण्याची सुविधा मिळेल. तसेच चाकूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) प्रशिक्षण केंद्रातील जवान आणि संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांसाठीही ही सेवा सोयीची ठरणार आहे.
विशेष म्हणजे, प्रस्तावित बिदर ते अमृतसर मार्गावरील सर्व स्थानके सध्या अस्तित्वात असलेल्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गावर आहेत. त्यामुळे नवीन रेल्वेमार्ग उभारण्याची आवश्यकता नसून, संबंधित रेल्वे विभागांनी तांत्रिक आणि वेळापत्रकाच्या दृष्टीने व्यवहार्यता तपासून या गाडीचा समावेश करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
मराठवाडा आणि कल्याण-कर्नाटकातील प्रवाशांची दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाची तातडीने व्यवहार्यता तपासणी करून बिदर-अमृतसर थेट एक्सप्रेसला मंजुरी द्यावी, अशी मागणी जी. एस. सौंदळे, कैलास तांदळे, सत्यनारायण दुबे, वसंतराव मुंडे, चेतन सौंदळे, श्रीकांत पाथरकर, मुकेश भूतडा, अनंत इंगळे, शंकर कापसे, अरुण पाठक, आर. जी. स्वामी तसेच परळी रेल्वे विकास समिती आणि मराठवाडा जनता विकास परिषद यांच्या वतीने करण्यात आली आहे.

No Comment! Be the first one.