लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : लग्नासाठी मुलगी दाखवून विश्वास संपादन केला आणि विवाहाच्या नावाखाली तब्बल पाच लाख रुपये उकळून बनावट लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील वानखेडेनगर परिसरात उघडकीस आला आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ३० वर्षीय शेतकरी लक्ष्मण गोळे यांची आरोपींनी संगनमताने फसवणूक केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी सुनील विठोबा खेमकर, कोमल राजू पवार, सचिन जाधव, कांता राहाणे आणि इतर आरोपींविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ ते १७ एप्रिलदरम्यान वानखेडेनगर येथील एन-१३ परिसरात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. लग्नासाठी एकूण पाच लाख रुपये घेऊन कोमल पवार हिच्याशी बनावट विवाह लावल्याचा आरोप आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुख्य संशयित सुनील खेमकर याला अहिल्यानगर येथील धनगर वस्ती परिसरातून पळून जात असताना पकडले. पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुभाष डेडवाल, शैलेश नलावडे आणि उमेश चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणाचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गोमटे करीत आहेत.

No Comment! Be the first one.