लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : चरस, गांजा आणि एमडीसारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीत वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत तस्कराला पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. मराठवाड्यात प्रथमच PITNDPS कायद्यान्वये कारवाई करत आदिल हमद चाऊस (वय ३६, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर) याला दोन वर्षांसाठी चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
आदिल चाऊस याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये सहा, तर इतर कायद्यांनुसार २० गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई तसेच एमपीडीए कायद्यान्वये सहा वेळा स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरीही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या.
त्यामुळे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी १८ नोव्हेंबर २०२६ रोजी PITNDPS कायद्यान्वये त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २७ नोव्हेंबर रोजी त्याची चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव आणि त्यांच्या पथकाने केली.

No Comment! Be the first one.