पोलीस कारवायांनंतरही वाळू तस्करीचा रात्रीचा खेळ सुरूच; महसूल विभागाचे अनिवासी वाळूविरोधी पथक नेमके करतेय काय..?
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे, पैठण
पैठण तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू तस्करीला पोलीस विभागाकडून वारंवार कारवाईचा दणका दिला जात असतानाही वाळू तस्करीचा गोरखधंदा थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र समोर आले आहे. शनिवारी रात्री बिडकीन पोलिसांनी पोरगाव परिसरात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनावर कारवाई करून वाहन जप्त केले. या कारवाईमुळे महसूल विभागाच्या अनिवासी वाळूविरोधी पथकाच्या कार्यक्षमतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू राहिल्यास संबंधित पोलीस ठाणे प्रमुख आणि बीट जमादार यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पैठण पोलिसांनी अवैध वाळू तस्करीविरोधात मोठी कारवाई करीत तब्बल दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
मात्र, या मोठ्या कारवाईचा तपास अद्याप संथ गतीने सुरू असल्याची चर्चा असून, कथित वाळू तस्करांचे चेहरे अद्याप समोर आलेले नाहीत. संबंधित हायवा वाहनाचा चालकही अद्याप अटकेत नसल्याने या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाळू तस्करीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैठण आयटीआय परिसरासह नवगाव, आपेगाव, नायगाव आणि मायगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतुकीचा रात्रीचा खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून सातत्याने कारवाया होत असताना महसूल विभागाचे वाळूविरोधी पथक नेमकी कोणती भूमिका बजावत आहे? या पथकातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष घटनास्थळी किती सक्रिय आहेत? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
एकीकडे पोलीस विभागाकडून अवैध वाळू तस्करीविरोधात धडक कारवाया सुरू असताना दुसरीकडे गोदावरी नदीपात्रातील वाळू तस्करी मात्र सुरूच असल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, बिडकीन पोलीस पथकाने पोरगाव परिसरात वाळू तस्करी करणारे हायवा वाहन जप्त केले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एम. तडवी यांनी दिली.

No Comment! Be the first one.