९८ हजार ४०० रुपयांचा साठा जप्त; ‘अंबाड मसाले’चे उत्पादन संशयाच्या भोवऱ्यात, अन्न परवाना निलंबित
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात अन्नभेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत २४ ऑक्टोबर रोजी चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेसर्स एल. एम. स्पायसेस या मसाला निर्मिती कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत ‘अंबाड मसाले’ ब्रँडचे २४६ किलो संशयास्पद मसाले, अंदाजे ९८ हजार ४०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
प्लॉट क्रमांक ई-१५/३२, एमआयडीसी चिकलठाणा येथे असलेल्या या कारखान्यात तयार होणाऱ्या मसाल्यांबाबत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासणीत संबंधित उत्पादने भेसळयुक्त आणि चुकीचे ब्रँडिंग केलेली (Adulterated/Misbranded) असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील कलम २३ आणि २६ चे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्षही नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत ‘अंबाड मसाले’ ब्रँडची १४३ किलो धने पावडर, अंदाजे ५७ हजार २०० रुपये किमतीची, तसेच १०३ किलो मिरची पावडर, अंदाजे ४१ हजार २०० रुपये किमतीची, असा एकूण २४६ किलो आणि ९८ हजार ४०० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेला माल सुरक्षित ताब्यात ठेवण्यात आला असून, मसाल्यांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. अजिंठेकर आणि फरीद सिद्दिकी यांच्या पथकाने ही कारवाई केली. सह आयुक्त (अन्न) एस. आर. करकळे आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) डी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
No Comment! Be the first one.