दुष्काळग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी एक लाख मदत देण्याची मागणी
लोकार्थ प्रतिनिधी प्रविण देशपांडे परभणी
जिंतूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देऊन ही रक्कम दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा करावी, तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी गुरुवारी (दि. 15 रोजी काँग्रेसच्या वतीने जिंतूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार प्रशांत जी. राखे यांच्याकडे देण्यात आले. त्याद्वारे, यंदाच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने जिंतूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर यांसह अन्य पिकांवर पावसाच्या खंडाचा प्रतिकूल परिणाम झाला असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीसाठी केलेला खर्च वसूल होण्याची शक्यता कमी असल्याने शेतकर्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने दुष्काळग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर करून ती दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी काँग्रेसने केली.
यासोबतच निवडणूक प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवत मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष केशवराव बुधवंत यांनी केले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागसेन भेरजे, सय्यद फिरोज भाई, शहराध्यक्ष इस्माईल पैलवान, नगरसेवक माज भाई, नगरसेवक अकबर, नगरसेवक प्रदीप देशमुख, रामप्रसाद महागडे, अनिल गाडेकर, वसीम पठाण, नगरसेवक यादवराव थिटे, अॅड. पुष्पाताई उबाळे, अंकुश राठोड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Comment! Be the first one.