शेतजमिनीच्या वादातून नामदेव पाईकराव यांची हत्या; दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी
लोकार्थ घोगरे पाटील अविनाश घोगरे पाटील घनसावंगी
घनसावंगी : तालुक्यातील जिरडगाव शिवारात शेतजमिनीच्या वादातून नामदेव अंजिराम पाईकराव यांचा धारदार शस्त्राने खून केल्याप्रकरणी घनसावंगी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपासाची चक्रे फिरवत दोघांना अटक केली. सुनील अंजिराम पाईकराव (रा. नाशिक) आणि सागर आनंदा चंद्रमोरे (रा. म्हसरूळ, नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जिरडगाव शिवारात सोमवारी (दि. ३०) रात्री खुनाची घटना घडली होती. या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. आरोपींच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती.
पोलिसांनी केलेल्या तपासात मयत नामदेव पाईकराव यांचा भाऊ सुनील पाईकराव याने शेतजमिनीच्या वादातून साथीदार सागर चंद्रमोरे याच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी सुनील पाईकराव आणि सागर चंद्रमोरे यांना ताब्यात घेत अटक केली. बुधवारी (दि. १) दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक जालना तेजवीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अंबड सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिस निरीक्षक केतन राठोड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक अशोक खरात, पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस हवालदार साईनाथ पवार, पोलिस कर्मचारी कृष्णा मुळे, राधेश्याम गुरसंगे व संजय तितकांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अवघ्या २४ तासांत आरोपी जेरबंद
जिरडगाव येथील खून प्रकरणानंतर घनसावंगी पोलिसांनी तपासाला वेग देत विविध दिशांनी माहिती संकलित केली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर अवघ्या २४ तासांत दोन्ही संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. पुढील तपासात खुनासाठी वापरलेले शस्त्र, हत्येचे नेमके कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

No Comment! Be the first one.