नांदेड पोलिसांकडून पहाटेपासून पदाधिकारी व शिवसैनिकांची धरपकड
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे
नांदेड तालुक्यातील वाडी बु येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली असून शहरातील विविध पोलिस ठाण्यात व पोलिस हेडक्वार्टर येथे जेरबंद केले आहे. यात शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे, शहरप्रमुख मनोज यादव यांच्यासह २५ ते ३० शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान वाडी बु येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळा संपल्यानंतर त्यांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वाखाली वाडी बु येथील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रतिकात्मक लोकार्पण करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना उबाठा व शिवसेना पदाधिकारी यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. तसेच शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख बबन बारसे यांनी सदर रुग्णालयाचे लोकार्पण शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात यावे म्हणून गडबड करीत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात काही गडबड होऊ नये म्हणून पोलिस अधिक्षक डॉ निलाभ रोहन यांनी शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची धरपकड करुन जेरबंद करण्याचे आदेश दिले. कारण जिल्हाप्रमुख बबन बारसे व तालुका प्रमुख सुनिल पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक ३१ आकटोबर रोजी सकाळी ८ वाजता वाडी बु येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख सुनिल पाटील यांनी रुग्णालयाच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला रिबीन बांधून ती जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या हस्ते कापून नारळ फोडले. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नारळ फोडून रुग्णालयाच्या इमारतीचे प्रतिकात्मक लोकार्पण कार्यक्रम आटोपून घेतला व रितसर उद्घाटन करण्यात आल्याची घोषणा बारसे यांनी केली. त्यामुळे संतापलेल्या शिवसेना आमदार हेमंत पाटील व आमदार बालाजी कल्याणकर यांना मिळताच शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आमदार बालाजी कल्याणकर यांनी केली आहे.
शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख बबन बारसे व शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याची घोषणा केल्यानंतर पोलिस अधिक्षक डॉ निलाभ रोहन यांनी शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताब्यात घेण्याची सुचना केली. त्यामुळे १ नोव्हेंबर रोजी पहाटेपासून स्थानिक गुन्हे शाखा व संबधित पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांनी शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घरातून उचलले आहे. शहरातील सर्व पोलिस ठाण्यात शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांना जेरबंद करुन पोलिस ठाण्यात व हेडक्वार्टर येथे नेऊन ठेवले आहे. जिल्हाप्रमुख बबन बारसे, युवासेना विभागीय सचिव महेश खेडकर, शहरप्रमुख मनोज यादव, शिवसेना तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम, उपजिल्हासंघटक माधवराव पांचाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळगिर महाराज गिरी, माजी पंचायत समिती सदस्य वसंतराव डुकरे, तालुका संघटक नवनाथ पाटील जोगदंड, शिवसेना उपतालुकाप्रमुख पुरभाजी जाधव पासदगावकर, उपतालुकाप्रमुख हरिभाऊ धुमाळ, मारोतराव कदम, गणेश भोसले, सौरभ देवकते, पावडे वाडी शाखाप्रमुख सुरेश पावडे, सचिन पाटील, दर्यापूर शाखाप्रमुख शिवाजीराव सूर्यवंशी, वाघी शाखाप्रमुख प्रकाशराव जानकर यांना जेरबंद केले आहे. नांदेड पोलिसांनी वरिल सर्व शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेऊन त्यांची धरपकड सुरू केली. सर्व शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिस हेडक्वार्टर येथे नेऊन ठेवले आहे. वाडी बु येथील उपजिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

No Comment! Be the first one.