जळकी बाजार फाट्याजवळ अपघात; ट्रॅक्टर-ट्रॉली दोन वेळा उलटली, चौघेही एकाच दुचाकीवरून जात होते
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
अजिंठा : काम आटोपून गावाकडे परतणाऱ्या चार मजुरांच्या दुचाकीचा रस्त्याच्या कडेला पंक्चरमुळे उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला भीषण अपघात झाला. जळकी बाजार फाट्याजवळ झालेल्या या दुर्घटनेत संदीप शामधन मंडावत (३४) आणि सचिन नंदू जामुंदे (३२, दोघे रा. जाळीचा देव, ता. जि. बुलडाणा) यांचा मृत्यू झाला, तर विकास भीमराव कपाटे (४५) आणि प्रशांत व्यंदेशकर (३५) हे दोघे गंभीर जखमी झाले.
चारही मजूर मिस्त्री कामासाठी मादनी येथे आले होते. दिवसभराचे काम आटोपून ते एकाच दुचाकीवरून गावाकडे परतत होते. दरम्यान, जळकी बाजार फाट्याजवळ ट्रॅक्टर-ट्रॉलीचे टायर पंक्चर झाल्याने ती रस्त्याच्या कडेला उभी होती. भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट ट्रॉलीला मागून धडकली. धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टर-ट्रॉली दोन वेळा उलटली आणि दुचाकीवरील चौघेही हवेत फेकले गेले.
अपघातानंतर नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना बुलडाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी संदीप आणि सचिन यांना मृत घोषित केले. विकास कपाटे आणि प्रशांत व्यंदेशकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत शेळके, व्ही. आर. पवार आणि दगडू तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.


No Comment! Be the first one.