अनधिकृत उपशामुळे संकट अधिक गंभीर होण्याची भीती
लोकार्थ प्रतिनिधी विजय सोनवणे भोकरदन
भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात सध्या अवघा २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने भोकरदन शहरासह परिसरातील सुमारे २० गावांवर आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाच्या सांडव्याजवळ पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याचे चित्र असून, यंदाच्या पावसाळ्यात दमदार पाऊस न झाल्याने धरणात अपेक्षित नवीन पाण्याची आवक झालेली नाही.
मागील वर्षी जुई धरणातील मोठ्या प्रमाणावर गाळ उपसण्यात आला होता. मात्र, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. सध्या ज्या ठिकाणी गाळ उपसा करण्यात आला होता, त्या खड्ड्यांमध्येच काही प्रमाणात पाणी साचलेले दिसत आहे. धरणातील एकूण परिस्थिती पाहता येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाममात्र साठ्यातही अनधिकृत पाणीउपसा?
धरणात पाणीसाठा अत्यल्प असताना काही शेतकऱ्यांकडून साचलेल्या पाण्यात वीज मोटारी टाकून अनधिकृतपणे पाणीउपसा केला जात असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध असलेला अत्यल्प साठाही अशा प्रकारे उपसला जात असल्यास भविष्यात नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
एकीकडे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असताना दुसरीकडे अनधिकृत पाणीउपशाच्या तक्रारी समोर येत असल्याने प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
भोकरदन शहराचा पाणी प्रश्न गंभीर होणार!
भोकरदन शहरासह संबंधित २० गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक असून, टंचाई आणखी तीव्र होण्यापूर्वी प्रशासनाने पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.
जुई धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही केवळ धरणाची समस्या नसून भोकरदन शहराच्या आगामी पाणीपुरवठ्याशी थेट संबंधित गंभीर बाब बनली आहे.

No Comment! Be the first one.