आठ वर्षांची मैत्री क्षणात संपली; लोखंडी रॉडने डोके, चेहरा अन् मानेवर सपासप वार
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : दांडियाचा ताल सुरू असतानाच दोन जिवलग मित्रांमधील वादाने रक्तरंजित वळण घेतले. आईवरून शिवी दिल्याचा राग मनात धरून नशेत धुंद तरुणाने आठ वर्षांच्या मैत्रीचा निर्दयी अंत केला. मित्राने गुडघ्यावर मारलेला लोखंडी रॉड हिसकावून त्याच्याच डोक्यावर, चेहऱ्यावर आणि मानेवर घाव घालत त्याची निर्घृण हत्या केली. मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगरमध्ये सोमवारी (१९ ऑक्टोबर) पहाटे तीनच्या सुमारास हा थरार घडला. पुष्कर सतीश गाडे (२०) असे मृत तरुणाचे नाव असून, महेश पवार उर्फ भोऱ्या (रा. संजयनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. पुष्कर आणि महेश यांची आठ वर्षांपासून जिवलग मैत्री होती. मात्र, दांडिया खेळताना झालेल्या किरकोळ वादाने या मैत्रीचे रूपांतर जीवघेण्या संघर्षात झाले. रागाच्या भरात पुष्करने महेशला आईवरून शिवी दिली. त्यामुळे संतापलेल्या महेशसोबत त्याची हाणामारी सुरू झाली. यावेळी पुष्करने पँटमध्ये लपवलेला लोखंडी रॉड काढून महेशच्या गुडघ्यावर मारला. त्यानंतर महेशने तोच रॉड हिसकावून पुष्करच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि मानेवर सपासप घाव घातले. या हल्ल्यात पुष्करचा मृत्यू झाला.
आईला दिली खोटी माहिती; मित्रालाच संपवले!
दांडिया खेळण्यासाठी घराबाहेर पडलेला पुष्कर मध्यरात्र उलटूनही परतला नाही. त्यामुळे काळजीत पडलेल्या आईने महेशला फोन केला. त्यावेळी ‘पुष्कर माझी गाडी घेऊन गेला आहे. तो आला की आम्ही दोघे एकत्र घरी येतो,’ असे सांगून महेशने तिला खोटी माहिती दिली. दरम्यान, हत्या केल्यानंतर महेशने एका पोलीस मित्राला फोन करून घटनेची माहिती दिली. या माहितीच्या आधारे मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महेशला ताब्यात घेतले. मैदानातून हत्येचा रॉड जप्त केला.
No Comment! Be the first one.