ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख रूपम घुगे यांची टीका
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
जालना : राज्य सरकारने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी एक टक्का निधी मंजूर केला असला, तरी हा निर्णय म्हणजे दिव्यांगांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या महिला जिल्हाप्रमुख रूपम घुगे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
मुंबई येथील आझाद मैदानावर २६ ऑक्टोबर रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी एक टक्का निधी राखीव ठेवण्याबाबत निर्णय घेतला.
मात्र, केवळ एक टक्का निधी मंजूर करून दिव्यांगांचे प्रश्न सुटणार नाहीत. दिव्यांगांच्या अनेक मागण्या आजही शासनदरबारी प्रलंबित आहेत. दिव्यांगांना आर्थिक मदत, विविध शासकीय योजनांचा लाभ आणि इतर मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिव्यांगांच्या सर्व प्रलंबित मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या लवकरात लवकर मंजूर कराव्यात, अशी मागणी रूपम घुगे यांनी केली.
सरकारने दिव्यांगांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दिव्यांगांच्या समस्यांबाबत त्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहितीही महिला जिल्हाप्रमुख रूपम घुगे यांनी दिली.
दिव्यांगांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत असून, आता शासन प्रलंबित मागण्यांबाबत कोणती भूमिका घेते, याकडे दिव्यांग बांधवांचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.