टाकळी अंबडमध्ये वजनात गडबडीचा आरोप; शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला धरून जाब विचारला; तरीही गुन्हा दाखल नाही
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
दुष्काळाने शेतीची अक्षरशः मसनवाट झाली असताना, शेतातून निघालेल्या कापसाच्या या ‘पांढऱ्या सोन्या’वरच काटेमारांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथे समोर आला आहे. वजनामध्ये गडबड करून शेतकऱ्यांची कथित लुबाडणूक केल्याचा आरोप असून, या प्रकरणात पाच लाख रुपयांहून अधिक कापूस खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, गावकऱ्यांनी संबंधित व्यक्तीला पकडून जाब विचारल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाच्या वजनानुसार पैसे देण्यात आले. मात्र, या कथित काटेमार टोळीविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
दुष्काळ जाहीर झालेल्या पैठण तालुक्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून विविध योजनांचे नियोजन सुरू आहे. मात्र, दुसरीकडे दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीचा काही व्यापारी गैरफायदा घेत असल्याचा आरोप होत आहे.
यंदा पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतातून थोडाफार निघालेला कापूस घरातील बालगोपाळांसह वेचून घरात आणला. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी या कापसातून मिळणाऱ्या पैशांची शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती. याच परिस्थितीचा फायदा घेत काही काटेमार व्यापारी शेतकऱ्यांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
नगदी पैशांचे आमिष दाखवून कापूस खरेदी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील काही कथित काटेमार व्यापाऱ्यांनी स्थानिक कापूस दलालाच्या माध्यमातून टाकळी अंबड येथील अनेक शेतकऱ्यांकडून पाच लाख रुपयांहून अधिक कापूस खरेदी केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, काही जागरूक शेतकऱ्यांनी शेतातून जमा केलेल्या कापसाचे वजन आधीच करून ठेवले होते. विक्रीच्या वेळी प्रत्यक्ष वजनात तफावत जाणवल्याने शेतकऱ्यांना संशय आला. त्यानंतर गावातील शेतकरी एकत्र आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिलीप नरके, जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव मुळे, ज्ञानेश्वर उगले आणि संतोष तांबे यांनी संबंधित व्यापाऱ्याला वजनातील तफावतीबाबत जाब विचारला.
यावेळी कापूस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने गावकऱ्यांनी त्याला धरून ठेवले. त्याच्याकडून या कथित काटेमार व्यवसायातील प्रमुख व्यक्तींची माहिती जाणून घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या कापसाचे प्रत्यक्ष वजन लक्षात घेऊन त्यांना पैसे वाटप करण्यात आले. त्यामुळे वजनातील गडबडीबाबत शेतकऱ्यांचा संशय अधिक बळावला आहे.
मात्र, संपूर्ण घटनाक्रम पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही संबंधित कथित काटेमार टोळीविरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
दुष्काळाने आधीच आर्थिक कंबर मोडलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर प्रशासन आणि पोलिसांकडून कारवाई होणार का, असा सवाल आता टाकळी अंबडमधील शेतकरी उपस्थित करत आहेत.
No Comment! Be the first one.