लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी,
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने दिवाळीचा शिधा परभणीत दाखल झाला आहे. दुष्काळाच्या संकटामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
‘भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसेल बांधावर!’ या घोषवाक्याच्या माध्यमातून शिवसैनिक शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश देत आहेत.
एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, तर दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांसमोर दिवाळीचा सण साजरा करण्याचे आव्हान उभे आहे. अशा परिस्थितीत गरजू कुटुंबांना दिवाळीच्या सणासाठी शिधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमातून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
या उपक्रमात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, महिला जिल्हाप्रमुख गीता सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष प्रभाकर कदम, शहर प्रमुख सचिन पाटील. रामदेव ओझा निखिल जैन. नरेश एरळकर. भागवत डुकरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवून त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. सणासुदीच्या काळात संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घेतला आहे.
‘भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसेल बांधावर!’ या घोषवाक्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासोबतच गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा संदेश शिवसेनेच्या वतीने देण्यात येत आहे.
No Comment! Be the first one.