निवडणुकीसाठी मतदान पथके रवाना
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी, दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान करता येणार असून परभणी जिल्ह्यातील एकूण ७६ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे
मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी अवजारे निर्मिती, चाचणी व प्रशिक्षण केंद्र येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व इतर व्यवस्थांची पूर्तता करून मतदान पथकांना संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते मतदान केंद्र क्रमांक २७३, आडगाव बाजार, तालुका जिंतूर येथील मतदान पथकाला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार परभणी संदीप राजापुरे, तहसीलदार गंगाखेड उषा किरण शृंगारे, तहसीलदार जिंतूर शीतल कचवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ७६ मतदान केंद्रांवर एकूण २६ हजार ६६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २१ हजार १८६ पुरुष व ५ हजार ४७८ महिला मतदारांचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी २६ क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता ७६ रूट गाईड कर्मचारी आणि प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत, शांततापूर्ण व नियमानुसार पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No Comment! Be the first one.