आमदार संतोष बांगर यांचा खाजगी सावकार आणि फायनान्स कंपन्यांना इशारा
लोकार्थ प्रतिनिधी गोपाळ सातपुते
हिंगोली जिल्ह्यासह परिसरातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे आणि शेतीतील नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये, अशा स्पष्ट सूचना आमदार संतोष बांगर यांनी खाजगी सावकार आणि फायनान्स कंपन्यांना दिल्याचे सांगण्यात आले.
“दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे,” असा इशारा आमदार संतोष बांगर यांनी दिला.
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून, नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अशा काळात दिलासा देणे आवश्यक आहे. दुष्काळ आणि पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, कर्जाची परतफेड करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खाजगी सावकार आणि फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुली करताना शेतकऱ्यांना मानसिक त्रास होईल, असे प्रकार टाळावेत, अशा सूचना देण्यात आल्या.
शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करावे. कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांवर दबाव आणणे किंवा त्यांना त्रास देणे योग्य नाही, अशी भूमिका आमदार संतोष बांगर यांनी मांडली.
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना दिलासा देण्याची गरज असून, शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार संतोष बांगर यांनी दिल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या माहितीत नमूद आहे.
No Comment! Be the first one.